शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१३

नवा मेंदू???

मेंदू हा बहुधा एकच अवयव आहे ज्याचे अजुन वैद्यकशास्त्राला रोपण करता आलेले नाही. म्हणजे, माणसाला संगणक बनवता येतो, वापरता येतो, निरनिराळ्या शास्त्रांमधल्या प्रगतीमुळे रोजचं जीवन सुकर करता येतं, दुर्दैवाने ज्यांच्या  शरीरातील एखादा अवयव काही कारणाने आपले काम करनासा होतो, तेव्हा तो काढून त्याच्याऐवजी मिळालेल्या त्याच प्रकारच्या अवयवाचं रोपण करुन पुन्हा आपले आयुष्य जगण्याची संधीही मिळते - हे सगळं केवळ मानव आपला मेंदू वापरुन हे वेगवेगळे प्रयोग करतो, मार्ग शोधतो म्हणून... पण सगळ्यांत आश्चर्यजनक अवयव, आपला मेंदू - तो मात्र अजुन बरीच गुपीतं आपल्यापासून लपवून बसला आहे. निसर्गातला हा चमत्कार, अत्यंत किचकट असा हा आपल्या शरीरातला संगणक अजुन आपल्याला नीटसा उमगलेलाच नाही; मग आपण त्याचे रोपण करण्यात यशस्वी झालेलो नाही यात खरं तर नवल वाटण्याजोगे काही नाही. अर्थात, हार मानील तर तो माणूस कसला? त्यामुळे प्रयत्न अर्थातच सुरु आहेत, काही प्राण्यांमध्ये ते यशस्वीही झाले आहेत. पण ते मानवापर्यंत पोहोचायला किती वर्षं लागतील याचे आज तरी काही गणित नाही.

आणि इथे तर प्रिया पाळंदे नुसतं मेंदूचं रोपण सुचवून थांबत नाहीत; तर नवा मेंदूही बनवून मिळेल याची ग्वाही देताहेत या विज्ञानकथेत - अर्थातच केवळ सहा शब्दांत.

नवा मेंदू बनवुन घ्या, तुमच्याच मेंदूतुन.

- प्रिया पाळंदे.

हे जर खरंच शक्य झालं तर त्याचा खरोखरीच उपयोग होईल असे पेशंट तर आहेतच, पण बघा - ज्यांच्या खांद्यावर काही आहे का अशी शंका यावी असे काही लोक तुमच्या अवती-भवतीच तुम्हांला माहीत असतील, बरोबर ना? हां - फक्त चुकून आरशाकडे बोट दाखवू नका!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा